धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्द जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रहिवासी आणि तालुक्यातील शिरसोली येथे नातेवाईक असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीने सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिरसोली ते दापोरादरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. आदल्या दिवशी रविवारी गावात मुलासह कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुकर बाबुराव पाटील (वय ७२, रा. शिरसोली प्र. न ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे मधुकर बाबुराव पाटील हे वर्षभरापूर्वी जळगाव येथे मुलासह राहायला गेले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. मिस्त्री कामावर मजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. रविवारी १४ एप्रिल रोजी शिरसोली गावात ते मुलासह कीर्तन ऐकण्यासाठी आले होते. कीर्तन संपल्यावर रात्री मधुकर पाटील यांनी त्यांच्या मुलाला, गावातच साळूकडे राहतो असे सांगितले. त्यामुळे मुलगा हा जळगावात परत गेला होता.

दरम्यान सोमवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान त्यांनी शिरसोली ते दापोरा दरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रेल्वे ट्रॅकमन राकेश महतो याने पोलिसांना याबाबत अवगत केले. त्यानंतर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहेकॉ अनिल फेगडे, धनराज चौधरी यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. तेथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी शोक व्यक्त केला होता. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content