जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे बायपासच्या कामाजवळ सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे. भाईदास नारायण भोई (वय ७०, रा. पाळधी ता. धरणगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी गावाजवळ बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी मशिनरी सांभाळण्यासाठी भाईदास भोई हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवार २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता जेवण करून ते कामाच्या ठिकाणी गेले होते. रात्री ९ वाजता एका अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली आणि ट्रकचालक पसार झाला. पाळधीच्या ग्रामस्थांनी भाईदास यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
भाईदास भोई यांच्या अपघाती निधनामुळे पाळधी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले आणि ३ मुली असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबाने आक्रोश करत शोक व्यक्त केला.