भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासासाठी रक्षाताई खडसे यांची बैठक

मुंबई-भुसावळ रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी आज मुंबईत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत रेल्वे गाड्यांचे थांबे, नवीन मार्गांचा विस्तार, प्रवासी सुविधा, पायाभूत प्रकल्प आणि मालवाहतूक क्षेत्राच्या प्रगतीवर सविस्तर चर्चा झाली. भुसावळ रेल्वे विभागाला आधुनिक सुविधांनी समृद्ध करण्याच्या दृष्टीने अनेक ठोस प्रस्ताव आणि निर्णय या बैठकीत समोर आले.

बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा झाली:

गाड्यांचे थांबे आणि मार्ग विस्तार: भुसावळ स्थानकावर अधिक गाड्यांचे थांबे मिळावेत यासाठी मागणी करण्यात आली. तसेच, खंडवा-सनावद मेमू स्पेशलचा भुसावळपर्यंत विस्तार करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
विशेष रेल्वे गाड्या आणि प्रवासी सुविधा: भुसावळ-पुणे दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. विदर्भ एक्सप्रेसमध्ये व्हीआयपी कोटा राखीव ठेवण्याची मागणी आणि अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रथम श्रेणी कोच जोडण्यावर विचारविनिमय झाला.
पायाभूत सुविधा आणि सेतू प्रकल्प: भुसावळ रेल्वे विभागातील पादचारी बोगदा (RUB) आणि पूल यांच्या समस्यांचे पुनरावलोकन करण्यात आले. नांदुरा ओव्हरब्रिजच्या कामाला गती देण्यासाठी ‘महा रेल्वे’ला त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. तसेच, टर्निंग एरियाच्या संदर्भात संयुक्त पाहणीचा निर्णय घेण्यात आला.
वस्तू वाहतूक आणि निर्यात धोरण: भुसावळ येथे कंटेनर लोडिंग सुविधेचे पुनरावलोकन करण्यात आले. एपीडा (APEDA) अंतर्गत निर्यात प्रक्रियेसाठी रेल्वे मंत्रालयाशी संयुक्त बैठक घेण्याचे ठरले.
इतर महत्त्वाचे मुद्दे: भुसावळ येथील मेमू (MEMU) रेल्वे कार्यशाळेच्या देखभालीसाठी तातडीने उपाययोजना करणे, पाचोरा-जामनेर रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर, जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाचा विकास आणि पहुर-शेंदूर्णी स्थानकांवर मालवाहतूक सुविधा वाढवण्याचे प्रस्ताव चर्चेत आले. कोविडपूर्व प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्यावरही विचार झाला

या बैठकीला भुसावळ रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित होते. रक्षा खडसे यांनी भुसावळ रेल्वे विभागाच्या विकासाला प्राधान्य देत प्रवाशांच्या सोयी आणि मालवाहतुकीच्या विस्तारावर विशेष भर दिला. बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावांवर लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले. या बैठकीमुळे भुसावळ रेल्वे विभागात नवीन सुविधा आणि आधुनिक बदल घडून येतील, अशी आशा व्यक्त होत आहे.

रक्षा खडसे यांनी यावेळी सांगितले की, भुसावळ रेल्वे विभाग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा रेल्वे जंक्शन असून, येथील सुविधांचा विकास झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या बैठकीतून पायाभूत सुविधा, प्रवासी सेवा आणि मालवाहतूक यांच्या विकासासाठी एक स्पष्ट आराखडा तयार झाला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल.

Protected Content