जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शनीपेठ भागातील भैय्यांची वखार व पार्वताबाई ओक नगर येथे सार्वजनिक शौचालय हे जुने व जीर्ण झाल्याने तेथेच बाजूला स्थलांतरित करून नवीन सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात यावे, अश्या मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष शैलेंद्र सपकाळे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शनिपेठ भागातील भैय्याची वखार व पार्वतीबाई ओक नगर येथे सार्वजनिक शौच्छालय महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले आहे. या ठिकाणी हे सार्वजनिक बांधकाम जुने व जीर्ण झाल्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील लोकांनी तोंडी व लेखी तक्रारी केलेली आहे. हे बांधकाम २० वर्षांपूर्वीचे असून यामध्ये पुरुषांसाठी ८ व महिलांसाठी १६ जणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान सार्वजनिक शौचालयाची नियमित साफसफाई होत नसल्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. शौचालयाचे चेंबर चॉकअप झालेले आहे, यातील घाण देखील निसरा होत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना उघड्यावर बसण्याची वेळ येत आहे. याचा विचार करून तातडीने सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून स्थानिक रहिवासी यांचे आरोग्य चांगले राहील, असे मागणीचे निवेदन माहिती अधिकार कार्यकर्ता शैलेंद्र सपकाळे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देऊन केली आहे.