Home Cities जळगाव अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पोच्या अधिकृत लोगोचे अनावरण

अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पोच्या अधिकृत लोगोचे अनावरण


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान परळी वैजनाथ, जि. बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो-२०२६’ या प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण आज जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपसंरक्षक राम धोत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल इधे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व दुग्ध व्यवसाय डॉ. प्रदीप झोड, तसेच सहाय्यक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हेमंत कुमावत उपस्थित होते.

लोगो अनावरणानंतर बोलताना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील उत्कृष्ट पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम ठरणार आहे. या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी प्रदर्शनाविषयी माहिती देताना सांगितले की, राज्यातील व राज्याबाहेरील जातीवंत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या तसेच विविध पक्षीप्रजाती प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग यांचे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. पशुधन आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्रही आयोजित करण्यात आले आहे.

लोगो अनावरणानंतर प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठी जिल्हाभर व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समित्या आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्स लावण्यात येणार असून, सोशल मीडियाद्वारेही माहिती प्रसारित केली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या प्रदर्शनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Protected Content

Play sound