जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी ‘इतके’ भारतात

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे भारतात असल्याचे स्विस एअर क्वालिटी टेक्नॉलॉजी कंपनी आयक्यू एअरच्या 2024 अहवालात समोर आले आहे. मेघालयातील बर्निहाट हे सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे, तर दिल्ली ही सर्वाधिक प्रदूषित राजधानी म्हणून समोर आली आहे. या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे. 2023 मध्ये भारत तिसऱ्या स्थानावर होता, म्हणजेच दोन स्थानांनी घसरण झाली आहे. याचा अर्थ, प्रदूषणात थोडीशी सुधारणा दिसून आली असली तरी समस्या अद्याप मोठी आहे. 2024 पर्यंत भारतामधील पीएम 2.5 पातळीमध्ये 7% घट झाल्याचे आढळून आले आहे. 2023 मध्ये ही पातळी 54.4 मायक्रोग्राम प्रति घनमीटर होती, तर 2024 मध्ये ती 50.6 मायक्रोग्राम प्रति घनमीटर झाली आहे.दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची पातळी अधिकच वाढलेली आहे. येथे पीएम 2.5 ची वार्षिक सरासरी 91.6 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर होती, जी अत्यंत धोकादायक मानली जाते.

अहवालानुसार, जगातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 6 शहरे भारतात आहेत. संपूर्ण यादीत भारतातील खालील 13 शहरे समाविष्ट आहेत:
बर्निहाट (मेघालय), दिल्ली, मुल्लानपूर, फरीदाबाद, लोणी, नवी दिल्ली, गुरुग्राम, गंगानगर, ग्रेटर नोएडा, भिवाडी, मुझफ्फरनगर,हनुमान गड,नोएडा

अहवालात नमूद केल्यानुसार, भारतातील 35% शहरे वार्षिक पीएम 2.5 पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या 5 मायक्रोग्राम प्रति घनमीटर मर्यादेपेक्षा 10 पट जास्त प्रदूषणाने ग्रस्त आहेत. याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान 5.2 वर्षांनी कमी होत आहे.

लॅन्सेट प्लॅनेटरी हेल्थ च्या अभ्यासानुसार, 2009 ते 2019 दरम्यान, प्रत्येक वर्षी भारतात सुमारे 15 लाख लोक वायू प्रदूषणामुळे मरण पावले. जगातील टॉप 20 प्रदूषित शहरांमध्ये पाकिस्तानमधील 4 शहरे आणि चीनमधील 1 शहर आहेत. दुसरीकडे, ओशनिया हा जगातील सर्वाधिक स्वच्छ प्रदेश ठरला आहे. तेथील 57% शहरे WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतात. भारतातील वायू प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण आरोग्यासाठी घातक पातळीवर पोहोचले आहे. सरकार आणि नागरिकांनी एकत्र येऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.

Protected Content