सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या पुजार्यांबाबत आक्षेपार्ह पोस्ट करून ती सोशल मीडियात व्हायरल केल्या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात एका तरूणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलीस स्थानकात आज तालुक्यातील खिरोदा प्र. यावल येथील गोविंदा जनार्दन चौधरी यांनी फिर्याद दिली. यानुसार, यावल तालुक्यातील कोळवद येथील रहिवासी अभय महाजन याने सोशल मीडियात अयोध्या येथील नियोजीत श्रीराम मंदिराच्या प्रमुख पुजारीपदी अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले पुजारी मोहित पांडे यांच्या विरोधात सोशल मीडियात त्यांचा फोटो मॉर्फ करून एक पोस्ट फेसबुकवरून शेअर केली.
या प्रकारामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून गोविंदा चौधरी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. यानुसार, अभय महाजन ( रा. कोळवद, ता. यावल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधीत व्यक्ती हा एका राजकीय पक्षाचा सोशल मीडिया पदाधिकारी असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरिक्षक जालींदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि हवालदार विनोद पाटील हे करीत आहेत.