नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नुपूर शर्मा हिच्या बेताल वक्तव्यांमुळे देश पेटला असून तिने देशाची माफी मागावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. उदयपूर येथील घटनेसाठी तीच जबाबदार असल्याचेही कोर्टाने म्हटले आहे.
उदयपूर येथील क्रूर घटनेने देश हादरून गेला आहे. यातील दोषींना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, या पार्श्वभूमिवर, एका याचिकेर सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे की, नुपूर शर्मा हिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सर्वोच्च न्यायालयाने तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली आहे, परंतु अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.
ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. तिच्या वक्तव्यांमुळे उडालेला आगडोंब पाहता नुपूर शर्माने आता देशाची माफी मागावी, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहे. यावर आता नुपूर शर्माकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.