Home उद्योग अणुऊर्जेच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणाला नवे बळ; ‘आयसोमेड २.०’मुळे वैद्यकीय व कृषी क्षेत्राला चालना

अणुऊर्जेच्या सहाय्याने निर्जंतुकीकरणाला नवे बळ; ‘आयसोमेड २.०’मुळे वैद्यकीय व कृषी क्षेत्राला चालना


मुंबई-वृत्तसेवा | मानवी कल्याणासाठी अणुऊर्जेचा शांततामय वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना ‘आयसोमेड’ प्रकल्पामुळे नवे बळ मिळाले आहे. १९७४ मध्ये तुर्भे येथे सुरू झालेल्या या सुविधेचे आधुनिकीकरण करून उभारण्यात आलेल्या ‘आयसोमेड २.०’ प्रकल्पामुळे निर्जंतुकीकरण प्रक्रिया अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक झाली आहे. एप्रिल २०२५ पासून या केंद्राचे व्यावसायिक कामकाज पुन्हा सुरू झाले असून वैद्यकीय उपकरणे, कृषी उत्पादने आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

भाभा अणुसंशोधन केंद्राशी संलग्न असलेल्या बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजी (ब्रिट) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पामुळे रुग्णालयांमधील संसर्गाचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी वापरली जाणारी उपकरणे, सिरिंज, वैद्यकीय साधने यांना पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी ‘गामा रेडिएशन’ ही पद्धत जगभर प्रभावी मानली जाते. त्याचबरोबर कृषी क्षेत्रात अन्नप्रक्रिया, बियाण्यांचे संरक्षण आणि विविध उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.

‘आयसोमेड २.०’मध्ये ‘कोबाल्ट-६०’ या रेडिओआइसोटोपचा वापर करून उत्पादनांना किमान २५ किली-ग्रे इतका किरणोत्सर्गाचा डोस दिला जातो. ही प्रक्रिया अत्यंत अचूक पद्धतीने पार पाडली जाते. त्यामुळे उत्पादनांचे मूळ स्वरूप किंवा पॅकेजिंग न बदलता त्यांना सूक्ष्मजीवमुक्त करता येते. यामुळे भारतीय बनावटीच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे निर्जंतुकीकरण मिळणार असून निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता आहे.

या केंद्रात अत्याधुनिक ‘स्काडा’ आधारित नियंत्रण प्रणाली बसविण्यात आली आहे. यामुळे रेडिएशन स्रोताचे नियंत्रण आणि उत्पादनांची हालचाल अधिक सुरक्षित पद्धतीने करता येते. तसेच इंटरलॉक्स आणि आपत्कालीन स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास कर्मचाऱ्यांचे रेडिएशनपासून संरक्षण सुनिश्चित केले जाते. या सुविधेला ‘करंट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’ तसेच ‘आयएसओ १११३७’सारखी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रेही मिळाली आहेत.

भारत सरकारच्या पत्र सूचना कार्यालयाने (पीआयबी) माध्यम प्रतिनिधींना या केंद्राची भेट घडवून दिली. याबाबत पीआयबीच्या उपसंचालिका जयदेवी पुजारी म्हणाल्या की, भाभा अणुसंशोधन केंद्र किंवा ब्रिटसारख्या संस्था राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्या स्वतःहून प्रसारमाध्यमांसमोर येत नाहीत. मात्र देशाच्या प्रगतीसाठी येथे सुरू असलेले संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, म्हणून अशा भेटी आयोजित केल्या जातात.

१९७४ मध्ये केवळ १२ उत्पादकांपासून सुरू झालेला ‘आयसोमेड’चा प्रवास २०१८ पर्यंत १६०० हून अधिक उत्पादकांपर्यंत पोहोचला आहे. ‘आयसोमेड २.०’मुळे ही संख्या आणखी वाढण्याची अपेक्षा असून भारतातील वैद्यकीय, कृषी आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना जागतिक दर्जाची निर्जंतुकीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे.


Protected Content

Play sound