जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आता शहरातील नियमित बाजार हा आठवडे बाजाराच्या जागेत भरणार असून यासाठी नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना जागा उपलब्ध करून दिली आहे. आज या जागेचे लकी ड्रॉ प्रमाणे वाटप करण्यात आले.
याविषयी अधिक माहिती अशी की, “जामनेर शहरातील गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले होते. या अतिक्रमणात व्यवसाय करणारे हातगाडी व्यावसायिक यांनी वेळोवेळी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांना भेटून आपल्याला व्यवसायासाठी जागा देण्यात यावी. अशी मागणी केली होती.
याबाबत मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी, ‘ज्यांना व्यवसाय करण्यासाठी जागा पाहिजे असेल त्यांनी नगरपालिकेला त्यासंदर्भात अर्ज करावा.’ असे आवाहन व्यावसायिकांना केल होते. त्यानुसार शहरातील २४३ हातगाडी विक्रेत्यांनी नगरपालिकेकडे अर्ज केला होता.
याची दखल घेऊन नगरपालिकेतर्फे त्यांना आठवडे बाजारातील जागा उपलब्ध करून दिली. नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी शहरातील २४३ हात गाडी, फळ, भाजीपाला व खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमित बाजार भरवण्यासाठी श्रीराम मार्केटमधील आठवडे बाजारच्या जागेमध्ये प्रत्येक व्यावसायिकाला सहा बाय आठचा ब्लॉक आखून दिला.
या जागेचे लकी ड्रॉ प्रमाणे आज बुधवार, दि. २७ जुलै रोजी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत भोसले, उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते जागेचे इन कॅमेरा लकी ड्रॉ काढून प्रत्येक व्यावसायिकांना जागावाटप करून देण्यात आली. आता हातगाडी व फळ विक्रेत्यांनी डेली बाजारासाठी नगरपालिकेने आखून दिलेल्या जागेवर आपला व्यवसाय सुरु करावा. असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.”
या बाजारच्या जागेमध्ये सुमारे ४३० व्यावसायिकांना जागा उपलब्ध होईल एवढे ब्लॉग आहे. त्यामुळे ज्यांना हातगाडी व छोटे व्यवसाय करायचे असेल त्यांनी या आठवड्याच्या आत नगरपालिकेकडे आपले नाव नोंदवावे. असे आवाहन मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी यावेळी बोलताना केले.