अमरावती, वृत्तसंस्था | भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत इतर पक्षांतून येणाऱ्या नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये आता जागा फुल्ल झाल्या आहेत, आता भरती होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१) येथे स्पष्ट केले. आज येथून ‘महाजनादेश’ यात्रेला सुरुवात करून भाजपने विधानसभा निवडणुकीचा बिगुलही फुंकला आहे.
शहरातील गुरुकुंज मोझरीतून भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून सुरुवात झाली. या महाजनादेश यात्रेच्या पहिल्याच सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या कामांची जंत्री मांडतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली. यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहोत. जनता दैवत आहे, जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत, असे सांगत या जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने गेल्या १५ वर्षात काय काम केले ? ते त्यांनी सांगावे, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले.
आम्ही गेल्या पाच वर्षात राज्यात ३० हजार किलोमीटर रस्त्याचे जाळे विणले आहे. हा देशातील एक विक्रम आहे. दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे कामही आमच्याच सरकारने केले आहे. आता मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे कामही सुरू आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक योजना आम्ही प्रामाणिकपणे राबवली आहे. त्यामुळे आम्हाला दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.