मुंबई वृत्तसंस्था । भारताचा युवा सलामवीर पृथ्वी शॉने क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले असून ‘आता माझी बॅटच बोलेल’ या आशयाचे हातवारे पृथ्वीने केल्यामुळे त्याला धारेवर धरले जात आहे. अर्धशतकाचा आनंद व्यक्त केल्यानंतर पृथ्वी शॉचा व्हिडिओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात ‘बीसीसीआय’ने ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वीचे हातवारे त्याची गुर्मी दाखवत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
असून सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आसामविरुद्ध पुनरागमनाच्या सामन्यात अर्धशतक केल्यानंतर बॅट उंचावणारा पृथ्वी शॉ टीकेचा धनी होत आहे. डोपिंग प्रकरणात आठ महिन्यांची बंदी सुनावल्यानंतर 20 वर्षीय पृथ्वी शॉने डोमेस्टिक सामन्यातून पुनरागमन केलं. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई संघाकडून पृथ्वी खेळत होता. त्याने 39 चेंडूंमध्ये 63 धावांची खेळी केली. ‘युवा क्रिकेटपटूंचा तोरा अविश्वसनीय आहे. बंदीनंतर आलेला हो पोरगा अर्धशतक करतो, तेही यथातथा गोलंदाजांसमोर. इतका माज बरा नाही’ असे एका ट्विटर युझरने म्हटलं आहे. 16 मार्च 2019 ते 15 नोव्हेंबर 2019 या कालावधीसाठी पृथ्वी शॉवर बंदी लागू करण्यात आली होती. कफ सिरपमध्ये आढळणारा प्रतिबंधित घटक पृथ्वी शॉने घेतला होता. त्यामुळे तो अँटी-डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या वेळी 22 फेब्रुवारी 2019 रोजी इंदूरमध्ये पृथ्वी शॉने डोपिंग चाचणीसाठी सॅम्पल दिले होते. “टर्बुटालिन” नावाच्या औषधाचे पृथ्वी शॉने सेवन केल्याचे निष्पन्न झाले होते. हा पदार्थ ‘वाडा’ने बंदी घातलेल्या यादीमध्ये आहे. डोपिंगमध्ये बंदी असलेला घटक आढळून आल्यानंतर पृथ्वी शॉने 16 जुलै रोजी स्पष्टीकरण दिले होते. कफ सिरपसाठी हे औषध घेतल्याचं त्याने सांगितलं होतं. बीसीसीआयने हे स्पष्टीकरण मान्य केलं.