चेन्नई । येथील भाजप प्रदेश कार्यकारिणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने इडल्या विकणार असून याचा सेलम शहरापासून प्रारंभ करण्यात आला आहे.
तामिळनाडूमध्ये आता नरेंद्र मोदींच्या नावाने इडली विकण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी या इडलीला मोदी इडली असं नावही देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली तामिळनाडूच्या सेलम शहरात विकण्यात येत आहे. शहरातील जवळपास २५ ते ३० दुकानांमध्ये मोदी इडलीची विक्री केली जात आहे. दुसर्या टप्प्यात संपूर्ण शहरात मोदी इडली विक्रीस उपलब्ध होणार आहे. मोदी इडलीमध्ये ग्राहकांना १० रुपयात ४ इडली खाण्यास मिळतील. त्यासोबत एका वाटीत सांबार आणि चटणी देण्यात येईल.
भाजपा नेते महेश यांना ही संकल्पना सुचली असून मोदी इडली ही खाण्यास स्वादिष्ट असेल, ताज्या आणि शुद्ध भाज्यांनी सांबार बनवण्यात येईल. १० रुपयात ग्राहकांचे पोट भरेल असा दावा करण्यात येत आहे.दिवसाला ४० हजार इडली बनवण्यात येईल अशी माहिती महेश यांनी दिली आहे. सेलम शहरात जागोजागी पंतप्रधानांच्या नावावर मोदी इडलीची जाहिरात केली जात आहे.
याबाबत प्रदेश भाजपाचे सचिव भारत आर. बालासुब्रमण्यम म्हणाले की, सुरुवातीला मोदी इडली विक्रीसाठी काही दुकाने उघडण्यात येतील. याला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या आधारे मोदी इडली दुकानांची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती दिली आहे. तामिळनाडूतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर, भाजपने ही संकल्पना अंमलात आणल्याचे मानले जात आहे.