नवी दिल्ली, वृत्तसंस्था । कोरोना संसर्गाचे झटपट निदान करण्यासाठी संशोधकांनी एक नवी रॅपिड टेस्ट विकसित केली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ती अतिशय किफायतशीर असून याच्या मदतीने कुणीही स्वत:च आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला की नाही ? हे जाणून घेऊ शकणार आहे.
अमेरिकेतील मॅसाच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात एमआयटी येथील संशोधकांनी ही चाचणी विकसित केली असून या रॅपिड टेस्टला स्टॉप कोविड असे नाव देण्यात आले आहे. ही चाचणी अत्यंत स्वस्त असल्याने लोक स्वत:ची कोरोना चाचणी रोज स्वत: करू शकतील. लक्षणीय बाब म्हणजे या रॅपिड टेस्टमुळे अवघ्या एका तासात कोरोनासंबंधीचा अचूक अहवाल प्राप्त होऊ शकतो.
ही नवी रॅपिड टेस्ट सुमारे ९३ टक्के अचूक निदान करण्यास सक्षम आहे. सुमारे ४०२ रुग्णांवर या नव्या चाचणीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे अशा प्रकारची चाचणी लोक रोज घरातही करू शकणार आहेत. कारण ती आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. यामुळे कोरोना नामक जागतिक साथरोगावर नियंत्रण मिळविण्यास बळ मिळणार आहे.
नवी रॅपिड टेस्ट ही क्लिनिक, फार्मसी, नर्सिंग होम आणि शाळा नजरेसमोर ठेवून विकसित करण्यात आली आहे. या ठिकाणी कार्यरत असणार्या लोकांच्या संख्येचा विचार करूनच या टेस्टची किंमत एकदम कमी ठेवण्यात आल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.