जिल्ह्यात आता एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्याला ३३ कोटीवृक्ष लागवड अंतर्गत देण्यात आलेले ९३ लाख ४३ हजार १०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आता १ कोटी ७ लाख ३२२ करण्यात आले असल्याची माहिती जळगाव उपवनरक्षक डिंगबर पगार यांनी पत्रपरिषदेत दिली.

डिगंबर पगार पत्रकार परिषदेत म्हणाले की, या वृक्षलागवड मोहिमेत जिल्ह्यातील ४७ शासकीय विभागांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांना वेगवेगळे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहेत. यानुसार जळगाव वनविभागास १३ लाख ७० हजार, यावल वनविभागास २६ लाख ६९ हजार तर जळगाव महापालिकेस २५ हजार ३०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावर्षी वृक्ष लागवड कोठे करणार आहे याची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच जेथे वृक्षलागवड करण्यात येईल तेथे खड्डे खोदण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. जेणेकरून मे महिन्यांत या खड्ड्यांतील घातक जिवाणू मरून तेथे वृक्षलागवडीसाठी ते पोषक वातावरण तयार होवून जुलै महिन्यात तेथे प्रत्यक्ष वृक्ष लागवड करण्यात येईल. ज्या शासकीय विभागाला वृक्षलागवडीसाठी जमिन उपलब्ध नसेल त्यास वनविभागातर्फे नदी काठची सुमारे १ कि.मी. पर्यंतची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी विभागातील बहुतांशी रोपे नाल्याकाठी लावण्यात येईल. ३३ कोटीवृक्ष लागवडीचा कार्यक्रम राज्यात २०१६ पासून राबविण्यात येत असून यात जळगाव जिल्ह्यात २०१६, २०१७, २०१८ साली लागवड केलेल्या वृक्षांपैकी ऑक्टोबर २०१८ पर्यंत क्रमशा ६२.३३ टक्के, ७५.२० टक्के व ७८.२८ टक्के वृक्ष जिवंत आहेत. वृक्ष जगण्याची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकांनी सहभाग वाढवावा असे आवाहन डिगंबर पगार यांनी केले आहे. याप्रसंगी यावल उपवनरक्षक पी. टी. मोरणकर, उपजिल्हाधिकारी रासोयो शुभांगी भारदे, उदय सोनवणे आदी उपस्थित होते.

दरम्यान, वन विभागातील वनरक्षक (गट क) ९०० पदांची भरती प्रक्रीयासुरू असून ऑनलाईन अर्ज करण्याची ३ फेब्रुवारी ही अंतिम मुदत आहे. यासाठी १२ वी विज्ञान ही पात्रता आहे. अनुसुचित जमाती, माजी सैनिक, नक्षलग्रस्त यांच्यासाठी १०वी उत्तीर्ण ही पात्रता ठेवण्यात आलेली असून तरी पात्र लाभर्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content