यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील ग्रामपंचायत २०२३ मधील १५ व्या वित्त आयोगाचे निधीमध्ये चौकशी अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळी जावून केलेल्या चौकशीत आढळलेल्या अनियमितता त्रुटीबाबत १० मुद्यावर तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना येथील गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली मुदतीत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील ग्रामपंचायत मध्ये सन २०२३ मधील पंधराव्या वित्त आयोगाचे निधीमध्ये अनियमित्ता असल्याच्या तक्रारी साक्षी ठकसेन भागे व शेखर सोपान पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी प्रत्यक्ष स्थळी चौकशी केली असता त्यात आणि अनियमित व त्रुटी आढळून आल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. त्यात ग्रामपंचायतच्या वतीने केलेल्या १० विविध विकास कामाबाबत व आवश्यक साहित्य खरेदीमध्ये आढळलेल्या त्रुटी मध्ये ई – निविदा पद्धतीने साहित्याची खरेदी अथवा विकास कामाचे कंत्राट देताना बी-१ पद्धतीने निविदा काढून देणे, निविदा एकाचे नावावर तर खर्च दुसऱ्याचे नावे टाकणे, प्रशिक्षणावर केलेल्या खर्चामध्ये अनियमितता, निविदेची पाच टक्के रक्कम सुरक्षा अनामत म्हणून भरणा करणे आवश्यक असतांना ती न भरणे, ई – निविदा सादर करण्याची मुदत असतांना कार्यारंभ आदेश देणे, आराखड्या अनुसारच्या तरतूदी पेक्षा जास्त खर्च करणे अशा त्रुटी आढळल्याचे नोटीसमध्ये दर्शविले असून तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांनी मुद्येनिहाय मुदतीत खुलासा करण्याचे गटविकास अधिकारी यांनी आदेश दिले आहेत. तसेच नियमबाह्य झालेल्या लाखो रुपयाचा खर्चाची रक्कम दोघांमध्ये विभागून वसूल का करण्यात येवू नये अशी विचारणा केली आहे.