होय, शरद पवारांनी सरकार स्थापन करण्यात माघार घेतली : फडणविसांचा गौप्यस्फोट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणार्‍या व आजवर रहस्यमयी मानल्या गेलेल्या पहाटेच्या शपथविधी प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लीक टिव्ही या वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पहाटे अजित पवार यांच्या सोबत घेतलेल्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा आमचा फोनही घेणं बंद केलं होतं, ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. त्यानंतर मी आणि अजित पवार आम्ही दोघं सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं होतं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

 

या संदर्भात फडणवीस पुढे म्हणाले की, आमचा शपथविधी होण्याच्या तीन ते चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलाच नाही. आम्ही संपूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता. मात्र शरद पवार न आल्यामुळे सरकार पडल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Protected Content