मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभेतील विश्वासदर्शक प्रस्तावाच्या वेळेस गैरहजर राहिलेल्या कॉंग्रेसच्या नऊ आमदारांना पक्षाने नोटीस बजावली असून यात रावेर-यावलचे आमदार शिरीष चौधरी यांचा समावेश आहे.
अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर विश्वासदर्शक प्रस्ताव संमत करण्यात आला. यात प्रस्तावाच्या बाजूने १६४ तर विरोधात ९९ मते पडली. यातील लक्षणीय बाब म्हणजे विरोधकांच्या काही आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली. यात कॉंग्रेस पक्षाचे तब्बल नऊ आमदार विश्वासदर्शक प्रस्तावाच्या प्रसंगी हजर न राहिल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात कमी मते पडली. याप्रसंगी आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मदत करणार्या अदृश्य हातांचा आवर्जून उल्लेख केला होता. या नऊ आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी दिल्लीत श्रेष्ठींकडे केली होती.
या अनुषंगाने आज पक्षातर्फे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार आ. झिशान सिद्दिकी, धीरज देशमुख, कुणाल पाटील, राजू आवळे, मोहन हंबर्डे, शिरीष चौधरी आणि माधवराव पाटील जवळगावकर या विधानसभा सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान, आमदार शिरीष चौधरी यांनी आधीच लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी चार ठिकाणी भयंकर ट्रॅफीकमध्ये अडकल्यामुळे आपण चार मिनिटे लेट पोहचल्याने सभागृहात जाऊ शकलो नसल्याची माहिती दिली होती. असे असून देखील पक्षातर्फे त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे. या नोटीसीत त्यांना अनुपस्थितीची कारणे दाखविण्याचे सांगण्यात आले आहे.