जळगाव (प्रतिनिधी) श्री संत मुक्ताबाई संस्थानकडे ३० सप्टेंबर अखेर थकीत मुद्दल ८९ लाख २२ हजार व व्याज ३ कोटी ३५ लाख ९७ हजार असे एकुण ४ कोटी २५ लाख १९ हजार रूपयांची असलेली थकबाकी ३० दिवसात भरावी, अशा आशयाची नोटीस श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अॅड. रवींद्र पाटील यांना आज बजावण्यात आली. या नोटीसीमुळे जिल्हा बँक संचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानने सन १९९२ ते २००० या कालावधीत ८९ लाख २० हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. संस्थानकडे बँक कर्जाची थकबाकी झाल्यानंतर बँकेने सहकार न्यायालयात संत मुक्ताबाई संस्थेविरूध्द वसुलीचा दावा दाखल केला होता. सहकार न्यायालयाने सन १९९८ मध्ये बँकेच्या बाजूने निकाल देत कर्जाच्या वसुलीसाठी कलम ९८ अन्वये दाखला दिला होता. त्यानुसार तत्कालीन विशेष वसुली अधिकार्यांनी संस्थानच्या मालमत्तांवर बोजे बसविले होते. तरी देखिल बँकेची थकबाकी वसुल झालेली नव्हती. अखेर सन २००० मध्ये संस्थानच्या मालमत्तेचा लिलाव लावण्यात आला. मात्र लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने तो तहकुब करण्यात आला होता.
सन २००३ मध्ये संस्थानच्या मागणीनुसार संचालक मंडळाने ठराव क्र. ३६ नुसार संस्थेकडे तडजोड तारखे अखेर मुद्दल ८९ लाख २० हजार व व्याज ७३ लाख ९९ हजार असे एकुण १ कोटी ६३ लाख १९ हजार रूपयाच्या रकमेपोटी संस्थांनकडुन ३५ लाख २५ हजार रूपये भरणा करून घेऊन संस्थानला कर्जमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला होता. या ठरावात सहकार आयुक्तांची परवानगी घेण्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र सहकार आयुक्तांनी या तडजोडीला मान्यता दिली नाही.
लेखापरीक्षणात आक्षेप संस्थानच्या लेखापरिक्षणात आक्षेपावरून असे नमुद करण्यात आले की, बँकेचे संचालक व संस्थानचे अध्यक्ष व संचालक एकच असतांना सुट देणे अयोग्य आहे. बँकेच्या पोटनियमात मुद्दलामध्ये सुट देण्याची कोणतीही तरतूद नाही. तडजोडीमुळे बँकेचे झालेले नुकसान वसुल होण्याच्या दृष्टीने उर्वरीत मुद्दल व व्याज संस्थानच्या नावे टाकण्यात आली. संस्थानने त्याची परतफेड न केल्याने तहसीलदारांमार्फत बोजे बसविण्यात आले. दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेतील विषय नं. १४ व त्यावरील ठरावानुसार जिल्हाधिकार्यांकडील अपीलाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्याचा ठराव करण्यात आला होता. तर आज चक्क जिल्हा बँकेने नोटीस काढल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.