मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांना म्हणाले की, मी आता 4 वाजेनंतर अध्यक्षांचा निर्णय आल्यानंतर यावर भाष्य करेन. मी आता एवढेच सांगतो की, शिवसेना पक्ष म्हणून अधिकृत म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. विधानसभेत 67 टक्के आणि लोकसभेत 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष रेकग्नाइज केलं आहे. आम्हाला चिन्हही दिलं आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पण काही लोक मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. ही मॅच फिक्सिंग असती तर ते रात्री आले असते. त्या दिवशी अध्यक्ष माझ्याकडे आले, अधिकृतपणे वाहनातून आले. ते काही रात्रीतून लपून आले नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील काही कामे होती, कोस्टल हायवे असेल, इतर मुद्दे असतील त्यावर अधिकाऱ्यांसह अधिकृत बैठक झाली. लपूनछपून काम आम्ही करत नाही. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा संस्था चांगली असते आणि निकाल बाजूने लागत नाहीत तेव्हा ते आरोप करतात. अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल द्यावा हे मी सांगतो. आम्ही मेरिटवर निकाल द्या असं सांगतो, आमच्याकडे बहुमत आहे, पक्ष आहे, अधिकृत चिन्ह आहे. यामुळे निकाल आमच्या बाजूने निकाल द्यावा असं सांगतो. ठाकरेंना त्यांचा पराभव दिसू लागल्याने ते मुख्यमंत्री बदलाची भाषा करत आहेत, पराभव दिसू लागल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही घटनाबाह्य नाही, तर ते घटनाबाह्य आहेत. घटनाबाह्य सरकार बोलणाऱ्यांना आज मेरिटवर उत्तर मिळणं आम्हाला अपेक्षित आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमचं सरकार अधिक मजबूत झालं आहे. दीड वर्षे आम्ही जे काम केलं, त्या जोरावर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुती एक नंबरला आली, यांचा नंबर शेवटून पहिला आला, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. काही जण अकलेचे तारे तोडत आहेत. लोकशाहीमध्ये बहुमत, मेजॉरिटी यालाच महत्त्व आहे. सुप्रीम कोर्टाने निकालात जे काही मुद्दे उपस्थित केले, आयोगाने ज्या आधारे निर्णय घेतला, त्यावरून आज मेरिटवर आधारित निकाल अध्यक्ष घेतील असे आम्हाला वाटते. आजही आमचा व्हीप जो आहे त्यांना लागू आहे, म्हणून तशाच प्रकारचा मेरिटवर आम्हाला निकाल अपेक्षित आहे.