चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांच्या पराभवाची शक्यता काही एक्झिट पोलने वर्तवली आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भात आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. ”चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मी तयार नव्हतो. पण पक्षाचा आदेश आला आणि ही जागा लढवली”, असे सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. त्यांच्या या विधानाची आता चर्चा रंगली आहे. एक्झिट पोलचे अंदाच समोर आले, त्यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आनंदाची गोष्ट आहे, एक्झिट पोलच्या सर्व्हेमधून जनतेच्या मनातील भावना व्यक्त झाली. मला वाटत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासावर मते मागितली. हा देश म्हणजे माझा परिवार आहे, या भावनेने त्यांनी काम केले. या देशातील जनतेनं ४ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने कौल उभा केला तर देशाचा जास्त फायदा आहे”, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.
चंद्रपूरची जागा लढण्यासाठी मी तयारच नव्हतो. मात्र, जेव्हा पक्षाचा आदेश आला तेव्हा मी लढवली. १३ मार्च रोजी माझं तिकीट जाहीर झाले आणि १९ एप्रिलला मतदान झाले. या मतदारसंघात दोन जिल्हे आहेत. त्यामध्ये एक चंद्रपूर आणि अमरावती विभागाच्या यवतमाळमधील दोन विधानसभा मतदारसंघात माझा जास्त संपर्क नव्हता. पक्ष संघटना म्हणून कार्यकर्ते उत्साहाने काम करत होते. मी १६ मार्च १९९५ साली पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हा ठरवलं की निवडून आलं पराभव झाला तर लाजायचं नाही. आपण जनतेच्या सेवेसाठी आहोत”, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं.