नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही ! : संजय राऊत

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ईडी हा गमतीचा विषय झाला असून याला राजकीय हत्यार म्हणून वापरले जात आहे. यामुळे नाना पटोले यांच्यावर देखील ईडीच्या धाडी पडल्या तर आश्‍चर्य वाटणार नसल्याचे वक्तव्य आज संजय राऊत यांनी केले आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. ‘ज्यांच्याविषयी आरोप केले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, हा एक गंमतीचा विषय आहे. आम्हीसुद्धा अनेक संदर्भात व्यवस्थित माहिती जिथे द्यायची तिथे दिली आहे, पण आम्ही दिलेल्या माहितीवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली नाही. आताचा एका वकिलाच्या घरावर नागपुरात ईडीने धाड टाकली. मला नागपुरातून अनेकांनी फोन केले. भविष्यात नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण ते त्यांचे वकिल आहेत. हे सर्व कायद्याने होत आहे कर नाही त्याला डर कशाला असं विरोधक बोलतील. मग तुमच्याविरोधात पुरावे दिले त्यांच्यावर कारवाई का नाही? जर कोणी काही जुने अपराध केले असतील तर कारवाई व्हायला हवी. कायदा सर्वांना समान आहे, पण महाराष्ट्राच्या बाबतीत हा तराजू एका बाजूने झुकलेला दिसतो,’ असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधी पक्ष झुंडशाही करत असून या यंत्रणांचा वापर पाळलेल्या गुंडांप्रमाणे केला जात आहे, असा घणाघातही राऊत यांनी केला आहे.  ‘काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आणि यूपीएचं अध्यक्षपद या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसचं नेतृत्व कोणी करावं हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र काँग्रेसनं यूपीएच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न केले नाही तर असा पुढाकार घेणाऱ्या अन्य कोणाकडे तरी यूपीएचं नेतृत्व जाईल असं वातावरण सध्या देशात आहे. एनडीए कुणाची खासगी मालमत्ता नाही, तशी यूपीए देखील कोणाची खासगी मालमत्ता नाही,’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

 

Protected Content