जळगाव प्रतिनिधी । दाणाबाजार ते सुभाष चौक हा मार्ग एकेरी करत या रस्त्यावरून ३१ ऑगस्टपर्यंत खासगी वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी दाणाबाजार असोसिएशन व ट्रान्सपोर्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
३१ ऑगस्टपर्यंत दाणाबाजारात खासगी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दाणाबाजाराचा एकेरी मार्ग राहणार असून ११ वाजेपूर्वी माल वाहतूक करणार्या वाहनांना परवानगी दिली जाणार आहे. दाणाबाजारात सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. खासगी वाहने दुचाकी, चारचाकी, तीनचाकी, प्रवाशी रिक्षा यांनादेखील मज्जाव करण्यात आला आहे. तर, यात केवळ माल वाहतूक करणारे छोटा हत्ती, पीयाजो आणि हातगाडी यांनाच परवानगी राहणार आहे. तसेच दाणाबाजारात येणारी मोठी वाहने व इतर वाहनांना पार्किंग करण्यासाठी जुने बस स्थानक येथे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. खैरनार ऑप्टिकलपासून ते सुभाष चौककडे जाणारा मार्ग हा एकेरी मार्ग राहणार आहे.
नागरिकांनी या निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यात नियमांचा भंग करणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.