माझं नाव समृद्धी महामार्गावरून कोणीही मिटवू शकत नाही : फडणवीस

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । “कोणी कितीही प्रयत्न केले तरी समृद्धी महामार्गमधून माझं नाव मिटवू शकणार नाही. गेली वीस वर्षे ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. जेव्हा राज्याचे जनतेने मुख्यमंत्री म्हणून संधी दिली तेव्हा तो महामार्ग बांधला,” अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“आज आनंद या गोष्टीचा आहे की तेव्हा समृद्धी महामार्गाला जे लोक विरोध करत होते आज तेच लोक श्रेय घेण्यासाठी उद्घाटनाची तयारी करत आहे,” अशी कोपरखळीही फडणवीसांनी मारली. दरम्यान, समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झालं तर आनंद होईल. मात्र त्याचं कार्य पूर्ण केल्यानंतर उद्घाटन केलं तर जास्त बरं होईल. कारण काम पूर्ण न करता उद्‍घाटन केल्यास समृद्धी महामार्गाचा महत्त्व कमी होईल, असंही फडणवीस म्हणाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ठाकरे सरकारच्या कार्यकाळात पूर्ण होत आहे.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटनाला राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यापासूनही ठाकरे सरकार फडणवीसांना बाजूला ठेवणार का, याबाबत चर्चा सुरु झाली आहे. याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी विचारले असता त्यांनी महाविकास आघाडी सरकारला अप्रत्यक्षपणे टोले लगावले. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, त्यावेळी समृद्धी महामार्गाच्या उभारणीला जे लोक विरोध करत होते, ते लोकही आज रस्त्याच्या उद्घाटनासाठी प्रयत्न करत आहेत. हे पाहून मला आनंद वाटतो, असे फडणवीस यांनी सांगितले.

ठाकरे सरकार १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. परंतु, समृद्धी महामार्गाचे संपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. समृद्धी महामर्ग सुरु होतोय, या गोष्टीचा मला आनंद आहे. पण समृद्धी महामार्गाची सर्व कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. ती काम पूर्ण करूनच या महामार्गाचे उद्घाटन झाले पाहिजे. घाईघाईत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले तर अपूर्ण कामांमुळे या महामार्गाचे महत्त्व कमी होईल, अशी चिंता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

Protected Content