पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी) राज्याचे जलसंपदा,वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील हिवरी व हिवरखेडा या दोन्ही गावांच्यामधून जाणाऱ्या वाघुर नदीच्या लोंढ्यातून विद्यार्थांना जीवघेणा शाळा प्रवास करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नदीला पूर आला म्हणजे दोन्ही गावांचा संपर्कही तुटतो. अनेक वर्षापासून या नदीवर पुलाची मागणी होतेय. पण त्याकडे साफ दुर्लक्ष झालेय. विशेष म्हणजे मागील सलग २५ वर्षापासून ना. महाजन हे जामनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताय.
पहूर येथून जवळच असलेल्या हिवरी -हिवरखेडा या गावातील शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तारेवरची कसरत करावी लागतेय. विद्यार्थांना चक्क नदी ओलांडून नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागतेय. पावसाळ्यात दरवर्षी हिवरी -हिवरखेडा या गावातील ग्रामस्थांना नदीला पूर आला की, तारेवरची कसरत ही ठरलेली आहे. मागील कित्येक वर्षांपूर्वी पासून गावकरी पुलाची मागणी करीत आहे. परंतू याकडे सर्वांचे दुर्लक्ष झालेय.
हिवरी व हिवरखेडा ग्रामस्थांसाठी नेहमीचीच डोकेदुखी
हिवरी तसेच हिवरखेडा साधारण २ हजार लोकसंख्या असलेले गावं आहेत. या दोन्ही गावाच्या मधून वाघूर नदी वाहत असते. त्यामुळे हिवरी व हिवरखेडा या गावातील ग्रामस्थांना दोन्ही गावात जाण्यासाठी नदी ओलांडूनच जावे लागते. वाघूर नदीचे पात्र खूप मोठे असून समाधानकारक पाऊस झाल्यास मोठ्याप्रमाणावर पावसाळ्यात नदीला पाणी असते. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी तसेच नागरिकांना नदीच्या पाण्यातून तारेवरची कसरत करीत जीव मुठीत घेऊन मार्ग काढावा लागतो. दरम्यान, दोन्ही गावाच्या संपर्क कायम राहावा, यासाठी राज्याचे जलसंपदामंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुलाची मागणी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
पूर आला की विद्यार्थ्यांना सुट्टी तर मजूर घरी बसून
वाघुर नदीला जास्तीचे पाणी आले की मग दोन्ही गावांचा संपर्क तुटून वाहतूक बंद होते. हिवरखेडा येथील शाळकरी मुलांना तर अघोषित सुट्टी जाहीर होते. तर मजुरी, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणारे लोक घरीच बसतात. पाणी कमी झाल्याशिवाय गावातून बाहेर पडायला आणि गावात शिरायला कोणताही मार्ग नसतो. हिवरा येथील ग्रामस्थांही हिवरखेडे येथे जाताच येत नाही. हिवरी व हिवरखेडा गावाचा पुरामुळे कायमच संपर्क तुटत असतो. वर्षांनुवर्षे या समस्येने गावकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान, हिवरी -हिवरखेडा येथील पुलास मंजुरी मिळाली असून मा.ना.गिरीश महाजन यांनी सदर पुलासहीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत घेतला असल्याचे कळते.