मुंबई- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या तुलनेत हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छतेचे पालन होत नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
एका कार्यक्रमात बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी धार्मिक स्थळांवरील स्वच्छतेवर भाष्य केले आहे. याबाबत ते म्हणाले की, आपला देश असा आहे की आपल्या देशात हिंदू समाजाची जी मंदिरं आहेत तिथे स्वच्छता नसते. धर्मशाळा चांगल्या नसतात. मी लंडनमध्ये एका गुरुद्वारात गेलो होतो, रोमच्या चर्चमध्ये जाऊन आलो काही देशांमधल्या मशिदीही पाहिल्या तिथलं वातावरण स्वच्छ होतं. ते पाहून मला हे कायमच वाटत होतं की आपली जी श्रद्धास्थानं आहेत ती स्वच्छ असली पाहिजेत.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, मला जेव्हा यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी महाराष्ट्रातल्या देहू-आळंदी पालखी मार्गासाठी १२ हजार कोटींची मान्यता दिली. तुळजापूर, गाणगापूर, माहूर ही जी आपली श्रद्धास्थानं आहेत ती चांगल्या प्रकारे विकसीत करण्यासाठी आम्ही करतो आहोत असे ते म्हणाले.