निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या…

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । देवपूजेचे निर्माल्य घंटागाडीत गेल्यामुळे त्याचे पवित्र भंगते. त्यासाठी स्वतंत्र वाहन हवे, ही पंडित प्रदीप मिश्रा यांची संकल्पना उराशी बाळगून तरुण कुढापा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहन सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी ३१ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते भगवान महादेवांचे महाआरती करून करण्यात आले.

घरोघरी पहाटे देवपूजा केली जाते. या देवपूजेतील निर्माल्य् मात्र कचरा समजून घंटागाडीमध्ये टाकले जाते. यावर पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्वतंत्र निर्माल्य संकलन वाहन असायला हवे, अशी संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना उराशी बाळगून तरुण कुढापा मंडळांनी स्वप्न बाळगले. त्यानुसार निर्माल्य संकलन वाहन तयार केले. हे वाहन शहरात सगळीकडे जाणार आहे. एका प्रभागात आठवड्यातून एकदा हे वाहन येईल. त्यावेळी नागरिकांनी आपले देवपूजेचे निर्माल्य या वाहनात द्यायची आहे.

या वाहनाचे उद्घाटन बुधवारी ३१ मे रोजी शहरातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तरुण कुढापा चौकाच्या पुढे असलेल्या उमाळेश्वर महादेव मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी शहराचे आमदार राजूमामा भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, नगरसेविका चेतना चौधरी, मंगला चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना परदेशी, किशोर चौधरी, संजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

महाआरती झाल्यानंतर मान्यवरांनी निर्माल्य संकलन वाहनाला पुष्पहार घातला. त्यानंतर श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. या अभिनव संकल्पनेबद्दल मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी तरुण कुढापा मंडळ आणि उमाळेश्वर महादेव मंदिर महिला मंडळाने परिश्रम घेतले.

Protected Content