Home Cities जळगाव पहाटे रांगा लावूनही दाखले नाहीत; जळगाव महापालिकेचा पुन्हा भोंगळ कारभार

पहाटे रांगा लावूनही दाखले नाहीत; जळगाव महापालिकेचा पुन्हा भोंगळ कारभार


जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिकेच्या (मनपा) आस्थापना विभागातील भोंगळ कारभारामुळे नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी प्रचंड हाल सोसावे लागत असल्याचा प्रकार आज, शुक्रवार (३१ ऑक्टोबर) रोजी सकाळी उघडकीस आला. दाखल्यांसाठी टोकन पद्धत असल्यामुळे अनेक नागरिकांना पहाटे ५ वाजेपासूनच महानगरपालिका आवारात रांगा लावाव्या लागत आहेत. टोकन न मिळाल्यास दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

नेत्यांसमोर समस्यांचा पाढा:

आज सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांच्या रांगा लागलेल्या असतानाच, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिका आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार स्मिताताई वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे, मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टोकनसाठी ताटकळलेल्या संतप्त नागरिकांना ही संधी साधून आपली समस्या थेट खासदार स्मिताताई वाघ आणि जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासमोर मांडली. नागरिकांनी मनपाच्या निष्काळजी कारभाराबद्दल आणि दाखले वेळेवर न मिळण्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

दाखले देण्याची सुविधा दुप्पट होणार:

नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी याची तातडीने दखल घेतली. जिल्हाधिकारी घुगे यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना या संदर्भात तातडीने सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना निर्देश दिले की, सोमवारपासून नागरिकांना दाखले देण्याची सुविधा दुप्पट करावी, जेणेकरून रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही. तसेच, दाखले देण्याचे काम करणारे कर्मचारी कमी असल्यामुळे त्या ठिकाणी इतर कंत्राटी कर्मचारी देखील त्वरित नियुक्त करावेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या या हस्तक्षेपामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound