पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत भाजपच्या तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनीही शपथ घेतली असून या दोघांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार हे बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री आहेत. शपथविधी सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
बिहारच्या २४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात १२५ तर महाआघाडीच्या खात्यात ११० जागा आल्या. यंदा एनडीएत भाजपाला सर्वाधिक ७४ जागा मिळाल्या. त्यापाठोपाठ जेडीयूला ४३, मुकेश साहनी यांच्या वीआयपीला ४, माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला ४ जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाचे कटिहारचे आमदार तारकिशोर प्रसाद आणि बेतियाचे आमदार रेणू देवी यांनी शपथ घेतली. ते उपमुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, आजच्या शपथविधी सोहळ्यावर राष्ट्रीय जनता दलाने बहिष्कार टाकला. निवडणुकीत जनतेने सरकार बदलण्यासाठी मतदान केले होते, जनादेशाला शासनादेशामध्ये बदलण्यात आले असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी केला आहे.