पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आले असतानाच यावर गडकरींनी अखेर स्पष्टीकरण दिले आहे. मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. नेहरुंच्या चांगल्या कामांचेही आपण अनुकरण केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. तीन राज्यांमध्ये भाजपाचा पराभव झाल्यानंतर अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले. तीन राज्यांमधील पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले होते. नितीन गडकरी यांनी देखील ‘नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारावी’, असे सूचक विधान केल्याने चर्चेत भर पडली.

 

गडकरी यावेळी पुढे म्हणाले की, गंगेचं प्रदूषण कमी झालं असून, गरिबांच्या घराघरात वीज पोहोचल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू हे एक चांगले लेखक होते. मी त्यांची पुस्तकं वाचली आहेत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यांच्या विकासाचं मॉडल वेगळ होतं. यावेळी त्यांनी इंदिरा गांधींचीही स्तुती केली आहे. त्या अनेक पुरुष नेत्यांहूनही सक्षम होत्या, असंही गडकरी म्हणाले आहेत. त्यांच्याकडून भाजपा नेतृत्वावर होत असलेल्या टीकेवरही त्यांनी उत्तर दिलं. माझ्या विधानांची मोडतोड करून ती दाखवली जातात. मी जे बोललोच नाही, ते कोट करून दाखवले जाते. मागील काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते. स्वप्न दाखवणारे नेते जनतेला आवडतात. परंतु ती स्वप्नं पूर्ण न केल्यास जनतेचा मार खावा लागतो. त्यानंतर विरोधकांनी गडकरींनी मोदींना इशारा दिल्याची दवंडी पिटली होती. दरम्यान, २०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आम्ही जे लक्ष्य ठेवून आलो होतो, ते गाठण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरु आहे. जनता पुन्हा मोदी सरकारवर विश्वास टाकेल आणि पुन्हा देशात भाजपा सरकार येईल, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी हेच आगामी पंतप्रधान असतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Add Comment

Protected Content