नीरव मोदीची लंडनमध्ये चाललीय मजा; दि टेलिग्राफच्या व्हिडिओने खळबळ

nirav modi 1

लंडन (वृत्तसंस्था) पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी हा सध्या लंडनमध्ये असून या ठिकाणी त्याचा बिनधास्त फिरत असल्याचे समोर आले आहे. ‘दि टेलिग्राफ’ या लंडनमधील आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने याबाबत दावा केला आहे. नीरव मोदीला आम्ही शोधले असून तो वेस्ट एन्ड लंडनमध्ये एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचेही टेलिग्राफने म्हटले आहे.

 

लंडनमधील ‘द टेलीग्राफ’ या वृत्तपत्राचा प्रतिनिधी मिक ब्राउन याने मोदीला शोधून काढले आहे. ब्राउनने मोदीला अनेक प्रश्न विचारले, मात्र त्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ब्राउन याने मोदीवर असलेल्या कर्जाबाबत प्रश्न विचारले, मात्र मोदीने ‘नो कॉमेंट्स’ असे उत्तर दिले. ज्याचे आपण पैसे घेतले ते तुम्हाला शोधत आहेत असेही ब्राउन याने मोदीला विचारले. त्यावरही मोदी ‘नो कॉमेंट्स’ असेच उत्तर दिले. तुम्ही लंडनमध्ये किती दिवस राहणार, या प्रश्नाचेही मोदीने उत्तर दिले नाही. आपण राजकीय शरण येण्यास इच्छूक असून तसा अर्ज केल्याचे मला अधिकाऱ्यानी सांगितले आहे आणि आपल्या प्रत्यर्पणाचे प्रयत्नही सुरू आहेत, मग आपल्याला वाटते का की, तुमचे प्रत्यर्पण व्हायला हवे असा प्रश्नही ब्राउनने विचारला. मात्र या प्रश्नाचेही मोदीने ‘नो कॉमेट्स’ असेच उत्तर दिले. आपण सर्वच प्रश्नांवर मौन का धारण करत आहात असेही ब्राउन याने विचारले. मात्र यावर मोदीने मौनच धारण केले.

 

दरम्यान, नीरव मोदीच्या भारतातील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी एक असलेला अलिबाग किहीम येथील बंगलाही प्रशासनाने ताब्यात घेतला आहे. समुद्र किनारी असलेला हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करुन बांधण्यात आला आहे. त्यामुळे शुक्रवारी नियंत्रित स्फोटांच्या साह्याने हा बंगला अंशतः जमीनदोस्त करण्यात आला. बंगल्याच्या चारही बाजूने सुरुंग लावण्यात आली होती. पुढील १५ ते २० दिवसांत तो मशिनच्या मदतीने पूर्णपणे पाडण्यात येणार आहे.

Add Comment

Protected Content