पाचोरा प्रतिनिधी । येथील निर्मल सीडसने लोहयुक्त बाजरीचे वाण विकसित केले असून याबद्दल आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे कंपनीचा गौरव करण्यात आला.
लोह व जस्त या तत्वांची मात्रा मानवी आहारामध्ये आवश्यक असते. ती वाढविण्यासाठी निर्मल सिड्सने इक्रिसॅट व हार्वेस्ट प्लस या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातुन विकसित केलेला लोहयुक्त बाजरीचा धनशक्ति हा वाण देशातील शेतकर्यांपर्यंत पोहचवला आहे. त्यामुळे लोकांच्या आहारामध्ये या अन्नतत्वाची मात्रा वाढली. सुदृढ आरोग्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण असलेल्या निर्मल सिड्सच्या या योगदानाची दखल हार्वेस्ट प्लस ने घेवून निर्मल सिड्सला प्रशस्तीपत्र देवून एका समारंभात निर्मल सिड्सचा गौरव केला आहे. हैदराबाद येथे अलीकडेच झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यशाळेत हे प्रशस्तीपत्र हार्वेस्ट प्लस चे डॉ.उल्फगँग पिफर (संचालक ग्लोबल रिसर्च अँन्ड डेव्हलपमेंट) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
आफ्रिका खंडातील देश तसेच भारत, बांगलादेश, पाकीस्तान या देशात ह्या अन्नघटकांची कमतरता अतिशय जास्त आहे. त्यानुसार आहारातील लोह, जस्त व अ जीवनसत्वाचे महत्व, त्यासंबधी जागरुकता निर्माण करण्यासाठी २००४ मध्ये सीजीआयएआर आणि इफरी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी हार्वेस्ट प्लस या संशोधन कार्यक्रमाची सुरूवात केली. ह्या उपक्रमांतर्गत भारतीय लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश असलेल्या बाजरी पिकाच्या संशोधनासाठी व त्यामधील लोह आणि जस्त ह्या तत्वांची मात्रा वाढविण्यासाठी निर्मल सिड्स, इक्रिसॅट व हार्वेस्ट प्लस कडुन प्रयत्न सुरू झाले. प्रचलित बाजरी धान्यात लोहाचे सरासरी प्रमाण ४५-५० पीपीएम इतके असते. परंतु दैनंदीन लोहाची आवश्यकता लक्षात घेवून त्यावर अधिक संशोधन होवून हे प्रमाण ७७ पीपीएम पेक्षाही जास्त असलेले बाजरीचे वाण तयार करण्यात यश मिळाले.
हार्वेस्ट प्लस आणि निर्मल सिड्सने सन २०१० पासुन या वाणाच्या प्रसारासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी असंख्य मेळावे घेवून, पिक प्रात्यक्षिक दाखवून व तुलनात्मक चाचण्या विविध शेतकर्यांच्या शेतावर घेवून लोहयुक्त बाजरा धनशक्ति हा वाण प्रचलित साध्या वाण्यापेक्षा किती सरस व बहुगुणी आहे हे दाखवून दिले. या वाणाचे १५०० टनापेक्षा अधिक बियाणे शेतकर्यांना वितरीत करण्यात आले. निर्मल सिड्सच्या या योगदानाची व सातत्यशील प्रयत्नांची व संशोधनाची आता या पारितोषीकाच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.