अमळनेर-गजानन पाटील | येथील युवा उद्योजक निर्मल नेमाडे यांची अमेरिकन विद्यापिठातर्फे स्टार्टअपमध्ये निवड झाल्याने कळमसरे गावात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मूळचे अमळनेर तालुक्यातील नांदेड येथील रहिवासी परंतु वैद्यकीय व्यवसायानिमित्त कळमसरे येथे स्थायिक असलेले डॉ.सुधाकर नेमाडे व डॉ विजया नेमाडे यांचे लहान सुपुत्र युवा उद्योजक निर्मल सुधाकर नेमाडे यांच्या स्टार्ट अप ची न्यूयॉर्क येथील कॉर्नेल युनीव्हर्सिटी या जगप्रसिद्ध विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार्टअप साठी असणार्या कॉर्नेलमहा ६० या उपक्रमात निवड झाली आहे.
या उपक्रमात जवळपास १० हजार हुन अधिक प्रकल्पांची नोंदणी झाली होती. मात्र,वेळोवेळी झालेल्या मुलाखतीत अवघ्या ६० स्टार्ट अप ची निवड करण्यात आली. या साठ स्टार्ट अप मध्ये निवड झालेले कळमसरेचे निर्मल नेमाडे यांचा उपक्रमाचा देखील समावेश करण्यात आला आहे. घन कचरा व्यवस्थापन व कृषी व्यवसाय या संकल्पनेवर आधारित त्यांच्या स्टार्ट अप आयडिया ला प्रशिक्षणासाठी पॅनल कडून पसंती मिळाली आहे.
दरम्यान, निर्मल नेमाडे यांना पुढे कॉर्नेल विद्यापिठाकडून प्रशिक्षण मिळणार असून याचा उपयोग म्हणून शासनाच्या काही योजनांमध्ये सहभागी केले जाणार आहे. साहजिकच त्यांचा संकल्पनेवर आधारित स्टार्ट अप निवडीमुळे याचा निश्चितच राज्याला व राज्यातील शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे.
निर्मल नेमाडे यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत म्हणजेच कळमसरे गावी झाले असून,त्यांच्या या निवडी मुळे कळमसरे गावात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कमी वयात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला असून,सेंद्रिय शेती व पर्यावरण संबंधित उपक्रमामध्ये त्यांना आवड आहे.त्यांनी काही वर्षांपूर्वी तयार केलेले जिविका कंपनीचे रासायनिक कीटकनाशके व खत द्रव्ये चांगलेच नावारूपाला आले आहेत. त्यांचा स्टार्ट अप निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.