नवी दिल्ली वृत्तसंस्था । निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातला एक आरोपी अक्षय कुमार सिंह याने सुप्रीम कोर्टात फाशीच्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावत फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, आज सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकेवर सुनावणी घेतली. त्यावेळी सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या सुनावणीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासह जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस आर. भानुमती हे या खंडपीठात होते. आता बुधवारी नवे खंडपीठ तयार करण्यात येणार असून त्याच्यापुढे आता नव्याने सुनावणी होणार आहे. या आधी पीडीत कुटुंबीयाच्या वतीने ज्या वकिलांनी युक्तिवाद केला होता ते आपले नातेवाईक असल्याने या प्रकरणात मी सुनावणी करणे योग्य नाही, असे बोबडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडलीय.