नवी दिल्ली, वृत्तसंस्था | पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. लंडनच्या एका कोर्टाने ही वाढ केली. त्यामुळे नीरव मोदीच्या अडचणी वाढल्या आहेत.
लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाचे न्यायाधीश टॅन इकराम यांच्यासमोर मोदीला व्हिडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आले. यावेळी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. ब्रिटनमध्ये कोठडीत वाढ करण्यासाठी आरोपींना दर चार आठवड्यात कोर्टामध्ये हजर केले जाते. त्यानुसार मोदीलाही व्हिडिओ लिंकद्वारे कोर्टात हजर केले असता त्याच्या कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सध्या त्याला वँड्सवर्थ तुरुंगात पाठवण्यात आले आहे. भारताने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. मोदीनेही जामीन मिळवण्यासाठी चार वेळा प्रयत्न केला, पण चारही वेळा त्याचा जामीन फेटाळण्यात आला आहे.