रत्नागिरी, वृत्तसंस्था | “रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले,” अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार आणि भाजपाचे नेते निलेश राणे यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने शिवसेनेचे विधान परिषदेतील ज्येष्ठ नेते रामदास कदम नाराज असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना निलेश यांनी टीका केली आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने रामदास कदम नाराज असून ते नेतेपदाचा राजीनामा देणार आहेत, अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागल्या. याच पार्श्वभूमीवर निलेश राणेंनी कदमांवर टीका केली आहे. ट्विटवरुन निलेश यांनी कदम नाराज असल्याची बातमी रिट्विट करत त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम तुम्ही संपूर्ण वेळ राणेंना शिव्या घालून ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला आणि तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले. तुम्ही आम्हाला शिव्या घालून तुम्ही शिवसेनेशी किती निष्ठावान आहात हे दाखवायचा पण आज तुम्हाला उलट शिवी घालणार नाही कारण न घालता ती तुम्हाला बसलेली आहे,” असे ट्विट निलेश यांनी केले आहे.