मुंबई । गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सरकार पाडण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत असल्याच्या कथित वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादात भाजप नेते निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले की, पवार साहेब यांचा ‘गेम’ हा अजितदादांनीच केला आहे.
महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकार्यांनीच प्रयत्न केला होता, पण तो वेळीच हाणून पाडला, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. परंतु, मी असे काही बोललो नाही, हे वृत्त निराधार असल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी केला. मात्र, गृहमंत्र्यांच्या या विधानावरून शिवसेनेने आज भाजपावर जोरदार टीका केली आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
निलेश राणे म्हणाले कि, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शपथविधीवर टीका करते. मात्र अजित पवार पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित दादा पवारांनीच केला, असे उत्तर त्यांनी शिवसेनेला दिले आहे.
दरम्यान, शिवसेनेने आज सामना संपादकीयमधून फडणवीसांचा शपथविधी आणि काही अधिकार्यांवर निशाणा साधला होता. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे. यावर निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.