पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील पाटील कुटुंबात शासकीय अधिकारी होण्याचा मान पुन्हा एकदा मिळाला असून, प्रगतीशील शेतकरी भास्कर शंकर पाटील यांचे सुपुत्र निलेश भास्कर पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, महाराष्ट्र शासन, राजपत्रित अधिकारी (वर्ग 2) पदी निवड झाली आहे. पहूर गावासाठी ही अत्यंत भूषणावह आणि अभिमानास्पद बाब ठरली आहे.
शासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून निलेश पाटील यांनी कठोर परिश्रम घेतले. अथक मेहनत आणि तीव्र जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल पहूर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निलेश हे पहूर येथील सहकार महर्षी म्हणून परिचित असलेले प्रगतिशील शेतकरी भास्कर पाटील यांचे सुपुत्र आहेत. भास्कर पाटील हे ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन आणि गजानन दूध उत्पादक सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. सहकार क्षेत्रातील योगदानासाठी त्यांच्या कार्याची ओळख आहे.
या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अवघ्या दोन वर्षांपूर्वी याच कुटुंबातील त्यांचे चुलत बंधू तथा सेवानिवृत्त वाहतूक नियंत्रक कृष्णा शंकर पाटील यांचे सुपुत्र सचिन कृष्णा पाटील यांनीही MPSC परीक्षेत यश मिळवून खनीकर्म अधिकारी (वर्ग 2) म्हणून प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवली आहे. कुटुंबातील दोन तरुणांनी राजपत्रित अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यामुळे पहूर गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. निलेश पाटील यांच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



