जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावसाठी अत्यंत अभिमानास्पद! लातूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धेत जळगावच्या निकिता दिलीप पवार हिने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. जैन स्पोर्टस् अकॅडमीची प्रतिनिधी असलेल्या निकिताने महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय सुवर्णपदक विजेत्या निकिताने शानदार कामगिरी केली. तिने पहिल्या फेरीत ठाण्याच्या, दुसऱ्या फेरीत कोल्हापूरच्या खेळाडूला नमवले, तर अंतिम लढतीत पुणे येथील खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

हे निकिताचे या वर्षांतील राज्यस्तरीय स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या दमदार कामगिरीमुळे हैदराबाद येथे लवकरच होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे.
निकिताच्या या यशामागे प्रशिक्षक जयेश बाविस्कर आणि अजित घारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांच्यासह सर्व सदस्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.



