मुंबई (प्रतिनिधी) दुसऱ्या टी २० सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून शेवटच्या चेंडूवर धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. शेवटच्या चेंडूंवर १ धाव हवी असताना भारताला ती धाव रोखता आली नाही. सुझी बेट्सने ६२ धावा करून न्यूझीलंडच्या विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच न्यूझीलंड महिला संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
प्रथम फलंदाजी करत भारताने न्यूझीलंडला १३६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सुझी बेट्स हिने ६२ धावा केल्या. तिला डिव्हाईन (१९), सथरव्हेट (२३) आणि मार्टिन (१३) यांनी चांगली साथ दिली. त्यानंतर अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंडला ६ चेंडूत विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. पहिल्या चेंडूवर न्यूझीलंडने चौकार मिळवला. पण दुसऱ्या चेंडूवर मानसी जोशीने मार्टिनचा अडसर दूर केला. पुढील चेंडूवर ओव्हरथ्रोच्या २ धावा मिळाल्या. तर त्यापुढील चेंडूवर केवळ १ धाव देण्यात भारत यशस्वी ठरला. २ चेंडूत २ धावा हव्या असताना न्यूझीलंडने पुन्हा १ धाव घेतली. अखेरच्या चेंडूवर १ धावेची गरज असताना भारताला ती धाव रोखणे शक्य झाले नाही. त्याआधी मुंबईकर जेमायमा रॉड्रीग्जच्या ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने ६ बाद १३५ धावांपर्यंत मजल मारली होती.