हॅमिल्टन (वृत्तसंस्था) भारतीय महिला संघाला न्यूझीलंडमध्ये अखेरच्या टी-20 सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे भारतीय महिलांनी 3 टी-20 सामन्यांची मालिका 3-0 च्या फरकाने गमावली आहे.
अंतिम सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले 162 धावांचे आव्हान भारतीय महिला पूर्ण करु शकल्या नाहीत. 20 षटकांमध्ये भारतीय संघ 4 विकेटच्या मोबदल्यात 159 धावांपर्यंतच मजल मारु शकला. अवघ्या दोन धावांनी सामन्यात बाजी मारत न्यूझीलंडच्या महिलांनी मालिकाही खिशात घातली आहे. स्मृती मंधानाने भारताकडून धडाकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून सोडले, पण आपली जबाबदारी पूर्ण करणे तिला शक्य झालं नाही. अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला एका चेंडूत 4 धावा काढून संघाला विजय मिळवून देण्याचे आव्हान होते, मात्र ती देखील यामध्ये अयशस्वी ठरली.