रांची -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। भारतीय क्रिकेटला भविष्यातील नवा सुपरस्टार मिळाल्याचे संकेत देणारी एक अविश्वसनीय कामगिरी विजय हजारे ट्रॉफीत पाहायला मिळाली. बिहारकडून खेळणाऱ्या अवघ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अशी खेळी साकारली, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व हादरून गेले आहे. 84 चेंडूंमध्ये 190 धावा, त्यात 15 षटकार आणि 16 चौकार, ही खेळी केवळ धावांची नव्हे तर इतिहास घडवणारी ठरली.

काही दिवसांपूर्वीच 19 वर्षांखालील आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून भारताला 191 धावांनी मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र तो अपयशी ठरला. यानंतर सोशल मीडियावर आणि क्रिकेट वर्तुळात त्याच्यावर टीका झाली. मात्र, खऱ्या खेळाडूची ओळख संकटातच होते, हे वैभवने पुन्हा एकदा सिद्ध केले.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेशविरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमधील पहिल्याच सामन्यात उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याने अवघ्या 36 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. हे भारतीय खेळाडूचे लिस्ट ए क्रिकेटमधील दुसरे सर्वात जलद शतक ठरले आहे. याआधी हा विक्रम अनमोलप्रीत सिंगकडे होता, ज्याने 2024-25 च्या विजय हजारे ट्रॉफीत अरुणाचल प्रदेशविरुद्धच 35 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
या खेळीदरम्यान वैभवने भारताचा माजी अष्टपैलू युसूफ पठाणचा विक्रमही मोडून काढला. पठाणने 2010 मध्ये 40 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते, मात्र वैभवने त्याहून वेगाने शतक पूर्ण करून इतिहास रचला. इतकेच नव्हे तर, 14 वर्षे आणि 272 दिवसांच्या वयात लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी हा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
याआधी हा विक्रम अफगाणिस्तानच्या रियाझ हसनच्या नावावर होता. रियाझने 16 वर्षे आणि 9 दिवसांच्या वयात लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. वैभव सूर्यवंशीने हा विक्रम मोडत केवळ भारतीय क्रिकेटच नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्येही आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.
अल्पावधीत अपयशातून सावरत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची ही खेळी भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी आशा निर्माण करणारी ठरली आहे.



