जळगाव : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील बंगल्यात झालेल्या चोरीच्या प्रकरणाने आता नवा कलाटणी घेतला आहे. सुरुवातीला या चोरीत केवळ दागिने आणि रोकड रक्कम लंपास झाल्याचे सांगितले जात असले, तरी आता या प्रकरणात अत्यंत संवेदनशील आणि मौल्यवान कागदपत्रं, सीडी आणि पेनड्राईव्ह चोरीस गेल्याचे उघड झाले आहे. स्वतः खडसे यांनीच हा धक्कादायक खुलासा बुधवारी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. सुरुवातीला यामध्ये खडसे यांच्या घरातील सोने-चांदीचे दागिने आणि काही रोकड रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ खडसे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक खळबळजनक दावा केला. त्यानुसार चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील आणखी काही मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वाचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये काही सीडी, पेनड्राईव्ह आणि कागदपत्रांचा समावेश आहे.

२७ ऑक्टोबरच्या रात्री खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात ही चोरी झाली होती. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सहा ते सात तोळे सोने आणि सुमारे ३५ हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. मात्र, खडसे यांनी नंतर घरातील सर्व वस्तूंची तपासणी केली असता काही सीडी, पेनड्राईव्ह आणि महत्त्वाची कागदपत्रंही गायब असल्याचे आढळले. या सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये नक्की काय माहिती होती, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “या चोरीदरम्यान चोरट्यांनी ज्या कागदपत्रं आणि सीडी चोरून नेल्या आहेत, त्यांचा उद्देश केवळ आर्थिक नसून काही राजकीय हेतू असू शकतात. पोलिसांनी याची गंभीर चौकशी करावी.” त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या घरातील काही कागदपत्रं ही आपण माहिती अधिकाराच्या माध्यमातून मागविलेली भ्रष्टाचाराशी संबंधित होती, तसेच सीडींमध्येही काही महत्त्वाचा डेटा होता. मात्र, त्यातील मजकूराबाबत आपण सध्या काहीही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खडसे यांनी असेही म्हटले की, “आपल्या घरात कुठे काय ठेवले आहे, याची माहिती असल्याशिवाय अशी चोरी होऊ शकत नाही. चोरीच्या अगोदर परिसरातील लाईट बंद झाले होते आणि त्यानंतरच चोरी घडली. त्यामुळे हा केवळ साधा चोरीचा प्रकार नसून, यामागे सखोल कटकारस्थान असण्याची शक्यता पोलिसांनी तपासावी.”
दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला असून, या चोरीचा उलगडा करणे हे आता पोलिसांच्या प्रतिष्ठेचे प्रश्न ठरले आहे. खडसे यांनीही पोलिसांवर विश्वास व्यक्त करत सांगितले की, “ही चोरी राजकीय दृष्ट्या संवेदनशील असल्याने तपास यंत्रणा नक्कीच गुन्हेगारांचा शोध घेईल.”
एकूणच, एकनाथ खडसेंच्या मुक्ताई बंगल्यातील चोरी प्रकरण आता केवळ आर्थिक नुकसानीपुरते मर्यादित न राहता, राजकीय आणि माहिती-संवेदनशील अंगाने वळण घेत आहे. चोरी गेलेल्या सीडी आणि कागदपत्रांमधील माहिती काय आहे, याबाबत पुढील काही दिवसांत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे.



