Home आंतरराष्ट्रीय इराण-सौदी तणावात नवे वळण ; पाकिस्तान युद्धात उतरणार का?

इराण-सौदी तणावात नवे वळण ; पाकिस्तान युद्धात उतरणार का?


रियाध- वृत्तसेवा । मध्यपूर्वेत सुरू असलेल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीमुळे परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची रियाध येथे भेट घेतली असून या भेटीत इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत आणि त्याला उत्तर देण्याच्या रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

या भेटीनंतर प्रिन्स खालिद बिन सलमान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर पोस्ट करत बैठकीबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानचे लष्करप्रमुख तसेच संरक्षण दल प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्यासोबत संयुक्त धोरणात्मक संरक्षण कराराच्या कक्षेत चर्चा झाली. विशेषतः इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांबाबत आणि ते रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर दोन्ही बाजूंनी विचारविनिमय करण्यात आला. इराणच्या कारवायांमुळे संपूर्ण प्रदेशातील सुरक्षा आणि स्थिरतेला गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच इराणने परिस्थितीची गंभीरता ओळखून संयम दाखवावा आणि कोणतीही चूक टाळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तज्ज्ञांच्या मते, इराणच्या वाढत्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी सौदी अरेबिया एकट्याने संघर्ष करण्याच्या भूमिकेत नाही. त्यामुळे पाकिस्तानला आपल्या बाजूने उभे राहण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विश्लेषण पुढे येत आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात आधीपासूनच संयुक्त धोरणात्मक संरक्षण करार अस्तित्वात आहे. या करारानुसार, सौदी अरेबियाला गरज पडल्यास पाकिस्तानकडून लष्करी मदत मागण्याचा अधिकार आहे. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानला सौदी अरेबिया तेल पुरवठा, आर्थिक मदत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून सातत्याने सहाय्य करत असल्याने इस्लामाबादवर रियाधचा प्रभाव मोठा असल्याचे मानले जाते.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पाकिस्तानसमोर कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचेही मानले जात आहे. एकीकडे आर्थिक संकटाचा सामना करत असताना सौदी अरेबियासोबतचे संबंध टिकवणे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे रियाधच्या मदतीच्या बदल्यात पाकिस्तानला काही धोरणात्मक पावले उचलावी लागू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. खालिद बिन सलमान आणि असीम मुनीर यांच्या भेटीनंतर पाकिस्तान इराणविरुद्ध थेट किंवा अप्रत्यक्ष कारवाई करणार का, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

या बैठकीदरम्यान इराणकडून सौदी अरेबियावर होत असलेल्या ताज्या हल्ल्यांचाही मुद्दा चर्चेत होता. सौदीच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ‘शायबह ऑईल फिल्ड’च्या दिशेने येणारे १६ ड्रोन सौदी हवाई दलाने पाडले. याशिवाय अल-खरज येथील प्रमुख औद्योगिक क्षेत्रावर लक्ष्य केलेली बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रेही हवेतच नष्ट करण्यात आली. २८ फेब्रुवारीनंतरचा हा इराणकडून झालेला सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

मध्यपूर्वेत तणाव वाढत असताना संयुक्त अरब अमिरातीनेही गेल्या २४ तासांत १२५ हून अधिक ड्रोन आणि सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे निष्प्रभ केल्याची माहिती दिली आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून इराणकडून या कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रदेशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अरब लीग आणि इस्लामिक सहकार्य संघटना (OIC) यांनी या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. प्रदेशातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात घालणाऱ्या कोणत्याही लष्करी कारवाईला आंतरराष्ट्रीय समुदायाने रोखावे, असेही या संघटनांनी म्हटले आहे.


Protected Content

Play sound