जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी पुणे येथील भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) या कंपनीला पुढील पाच वर्षांसाठी नवीन ठेका देण्यात आला आहे. या नवीन उपक्रमाचा शुभारंभ मनपा आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते मंगळवारी २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घंटागाडीला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या निर्णयामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामात एक नवे पर्व सुरू होणार आहे. यापूर्वी वॉटर ग्रेस कंपनीकडे हे काम होते, मात्र त्यांच्या कराराचा कालावधी संपल्यामुळे प्रशासनाने हा बदल केला आहे.
या कार्यक्रमावेळी बोलताना मनपा आयुक्त डॉ. ढेरे यांनी शहरवासीयांना स्वच्छतेच्या मोहिमेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. नागरिकांनी कचरा वेगळा करून घंटागाडीत द्यावा आणि शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे.” बीव्हीजी कंपनीकडूनही दर्जेदार सेवा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देत जळगावला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी शहर बनविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे मत मांडले.

या शुभारंभ प्रसंगी आरोग्य विभाग प्रमुख उदय पाटील, बीव्हीजी कंपनीचे घनकचरा व्यवस्थापन प्रमुख श्रीकांत हांडे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या नव्या व्यवस्थेमुळे शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.



