मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आजचा दिवस मुक्ताईनगरच्या राजकीय पटलावर ‘सुवर्णक्षण’ म्हणून नोंदवला गेला आहे. राजमाता माँ साहेब जिजाऊ यांची जयंती आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे (राष्ट्रीय युवा दिन) औचित्य साधून, कु. संजनाताई चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा पदभार अत्यंत उत्साही आणि ऐतिहासिक वातावरणात स्वीकारला. या सोहळ्यामुळे मुक्ताईनगरच्या विकासकामांच्या एका नव्या पर्वाची अधिकृत सुरुवात झाली आहे.
प्रेरणादायी मुहूर्तावर पदग्रहण :
सकाळी नगरपंचायत कार्यालय परिसरात एक वेगळाच उत्साह संचारला होता. माँ साहेब जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संजनाताईंनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. आजच्या युवा पिढीला सोबत घेऊन मुक्ताईनगरला एक आदर्श शहर बनवण्याचा माझा मानस असल्याचे संजनाताई पाटील यांनी सांगितले.

प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी :
या पदग्रहण सोहळ्यास मुक्ताईनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पुदाके आणि पाणीपुरवठा अभियंता इंगळे यांनी उपस्थित राहून नूतन नगराध्यक्षांचे प्रशासकीय स्वागत केले. राजकीय क्षेत्रातून शिवसेना उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, शिवसेना अल्पसंख्यांक महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अफसरभाऊ खान, युवासेना जिल्हाप्रमुख पंकजभाऊ राणे आणि शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल पाटील यांनी संजनाताईंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे सोहळ्याला विशाल स्वरूप प्राप्त झाले होते.
सर्व प्रभागांच्या प्रतिनिधींचे ऐक्य :
या सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मुक्ताईनगरमधील विविध प्रभागांमधून निवडून आलेले नगरसेवक. संजनाताईंसोबत खांद्याला खांदा लावून कामाचा निर्धार व्यक्त करण्यासाठी खालील नगरसेवक उपस्थित होते: प्रशांत टोंगे (प्रभाग १), युनूस खान (प्रभाग ३), हासम शाह (प्रभाग ४), खान नसीमाबी शहाबाज (प्रभाग ५), प्रीती वानखेडे (प्रभाग ६), अंजनाबाई सोनवणे (प्रभाग ७), मुशीर मणियार (प्रभाग ९), शेख ताहिराबी लुकमान (प्रभाग १०), शेख मस्तान शेख इमाम (प्रभाग ११), संतोष कोळी (प्रभाग १३), प्रमोद भारंबे (प्रभाग १४), सविता भलभले (प्रभाग १५) आणि देवयानी शिरसाट (प्रभाग १६).
नव्या स्वप्नांची भरारी पदभार :
स्वीकारल्यानंतर नगराध्यक्षांनी तात्काळ नगरपंचायत कर्मचाऱ्यांची भेट घेऊन शहराच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. शहरातील स्वच्छता, शुद्ध पेयजल आणि नियोजित नागरी सुविधांवर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. उपस्थित समर्थकांनी ‘संजनाताई पाटील आगे बढो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.



