जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव येथे परिवहन संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका एमएच-19/ईक्यू 0001 ते 9999 लवकरच सुरू होणार आहे.
ज्या वाहनधारकांना आपल्या नवीन वाहनांसाठी आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करायचा असल्यास, त्यांनी या कार्यालयात दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2025 रोजी अर्ज दुपारी 4 वाजेपर्यंत जमा करायचे आहेत.
पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे, त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी संलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.
दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. 25 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत कार्यालयात एका क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास, एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत वाढीव शुल्काचा धनाकर्ष स्वतंत्र बंद लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक राहील.
बंद लिफाफे हे 27 फेब्रुवारी रोजी 4.30 वाजता सहाय्यक/उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या समक्ष उघडण्यात येतील आणि जास्त रकमेचे धनादेश सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश संबंधितांना परत करण्यात येतील, असे जळगावचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.