चाळीसगाव प्रतिनिधी । लोकसहभागातून चाळीसगावात कोविड केअर आणि क्वॉरंटाईन सेंटर उभारण्यात येत असून यासाठी समाजातील दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांनी केले. ते येथील सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते.
महसूल प्रशासनातर्फे चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात आयोजित सर्वपक्षीय व संघटनांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण नगराध्यक्षा सौ.आशालताताई चव्हाण , प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर,तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. बी पी बाविस्कर, डॉ. सी टी पवार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. मंगेश चव्हाण म्हणाले की, कोरोना या जागतिक महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना अपूर्ण सोयी सुविधांअभावी अनेक निष्पाप रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. शासन – प्रशासन आपापल्या पद्धतीने काम करत असताना चाळीसगाव तालुक्यात आढळणारा प्रत्येक रुग्ण हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे ही भावना ठेवून जर आपण आगामी काळात उपाययोजना आखल्या तर निश्चितपणे आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू शकू. यासाठी चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्ती – सामाजिक संघटना यांनी पुढे यावे व लोकसहभागातून सर्व सोयीसुविधायुक्त जिल्ह्यातील मॉडेल असे क्वारंटाइन व कोविड सेंटर चाळीसगाव येथे उभारूया असे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
मंगेश चव्हाण पुढे म्हणाले की, आता बोलायची नाही तर कृतीची वेळ आली आहे. ही आपत्ती असून आज न उद्या आपल्या घरापर्यंत येणार आहे. म्हणून गट – तट – श्रेयाच राजकारण बाजूला ठेवून सर्वाना योगदान द्यावे लागणार आहे. माझ्या आमदार निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका, शववाहिका, ५० बेडसाठी ऑक्सिजन सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे तसेच स्वखर्चातून अंधशाळा येथील कोविड सेंटर येथे शुद्ध पाण्यासाठी ठज प्युरीफायर बसविण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयातील सुसज्ज क्वारंटाइन व कोविड सेंटर साठी देखील जे जे शक्य होईल ते पदर खर्चातून मदत करेल असे आश्वासन देखील आमदार चव्हाण यांनी दिले. पुढे बोलताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की कोरोना संकटकाळात जनतेला धीर देण्यासाठी भाजपासह इतर पक्ष व संघटनानी अन्नसेवा, स्थलांतरित मजुरांना मदत, तालुक्यातील इतर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना मदत, गावागावात आर्सेनिक अल्बम गोळ्या व फवारणी साठी औषधी वाटप या माध्यमातून मदत केली. पत्रकार बांधव, व्हाटसअप ग्रुप व सामाजिक कार्यकर्ते – संघटना यांच्या मदतीने आपण तीन वेळा जनता कर्फ्यू यशस्वी केला. हेच एकीचे बळ आपल्याला पुढील काळात दाखवायचे असून सुदैवाने मागील भाजपा शासनाच्या काळात तत्कालीन आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाने एक चांगली वास्तू आपल्याला उपलब्ध आहे. संकट हीच संधी मानून चाळीसगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने काम करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार उन्मेष पाटील यांनी मनोगतात सांगितले की, लोकसहभागातून ही व्यवस्था उभारावी असा मानस आहे. यासाठी लागणार्या आरोग्य उपकरणे, साधनसामुग्री , साहित्य याची त्वरित उपलब्धता व्हावी. आणि १५० रुग्णांना क्वारंटाईन करता येईल. या दृष्टीने नियोजन करावे, कोविड माहिती कक्ष स्थापन करून शहरातील व ग्रामीण भागातून दाखल होणार्या रुग्णांची माहिती, त्यांच्या दैनंदिन रिपोर्ट, कुठे ऍडमिट केले आहे, जळगावला पाठवण्यात आले आहे किंवा नाही पेशंटची प्रकृती व सद्यस्थिती ची माहिती देण्यासाठी एकाच सेंटरवरून माहिती देण्यात यावी अशी तातडीने उपाययोजना करावी असे खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले.
यांनी जाहीर केली मदत
या बैठकीत महसूल व आरोग्य प्रशासनाने सामाजिक दायित्व व लोकसहभागातून मदतीचे आवाहन केल्यानंतर रोटरी क्लबतर्फे ३ सक्शन मशीन्स, पुन्शी ब्रदर्स तर्फे १० बेड्स, राष्ट्रवादी तर्फे वाटर फिल्टर, जैन श्रावक संघातर्फे ५ बेड्स, शिवसेना तर्फे ३ बेड्स, महावितरण चाळीसगाव तर्फे ५ बेड्स, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने २ बेड्स, अशी मदत जाहीर करण्यात आली. तसेच इतर अनेक दात्यांनी देखील मदती देण्याचे जाहीर केले
यांची होती उपस्थिती
या बैठकीला आयएमएच्या डॉ.स्मिता मुंदडा, डॉ. दामीनी राठोड, डॉ. मंगेश वाडेकर, डॉ. लीना पाटील, डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. विनय पाटील, डॉ.अरकडी, डॉ किरण मगर , डॉ पंकज निकुंभ, डॉ. शशिकांत राणा, जनरल प्रॅक्टिस असोसिएशनचे डॉ.महेश वाणी, डॉ. सुजित वाघ ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, महावितरणचे संदीप शेंडगे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी पं स सदस्य दिनेश बोरसे, नगरसेवक गटनेते संजय पाटील, नगरसेवक श्याम देशमुख, शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव खलाणे,सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे , सामाजिक कार्यकर्ते नरेन काका जैन,रोटरीचे प्रकाश बाविस्कर, संमकीत छाजेड,काँट्रॅकटर एकनाथ चौधरी डॉ. महेश निकुंभ, डॉ. महेंद्र राठोड प्रदीप देशमुख योगेश भोकरे भास्कराचार्य स्कूलचे प्रा.उमाकांत ठाकूर ,राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण, उद्योगपती राज पुंशी, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, पत्रकार देवीदास पाटील उमेश बर्गे, मनोहर कांडेकर, रमेश जानराव, मंगेश शर्मा, सुनील राजपूत आदी उपस्थित होते.
यावेळी आयएमए च्या डॉ स्मिता मुंदडा व डॉ मंगेश वाडेकर यांनी मनोगतातून दात्यांचे आभार मानले तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे आणि ज्या इच्छुकांनी या कोविड केंद्रात काम करण्याची इच्छा आहे. अशा इच्छुकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.