राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरु : उद्धव ठाकरे

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो, असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

 

आजच्या सामनातील अग्रलेखात म्हटले आहे की, आपण महाराष्ट्राचे मालक आणि देशाचे बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्या खुळ्या मानसिकतेतून बाहेर पडा. अन्यथा मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने प्रवास सुरू होईल. कालच्या राज्यकर्त्यांना लोकांनी वेडे ठरवावे हे आम्हाला बरे वाटत नाही. सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असे कोणत्या तोंडाने सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळे इतके मनास लावून घेऊ नका, पुन्हा आमचेच सरकार’ अशा किंकाळ्या महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाडत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील आणि किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांत भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला बाधक आहेत. आम्हाला याची चिंता वाटते. राजकारणात ज्यांच्याकडून निरपेक्ष निर्णयाची अपेक्षा असते ते ‘पंच’ फुटल्यावर पराभवाच्या टोकास गेलेल्यांच्या आशा पल्लवित होणारच. ‘पुन्हा आमचे सरकार’ हा आत्मविश्वास त्यातूनच जागा झाला असेल. पण मैदानावर स्टम्प नावाची दांडकी आहेत. जनता ती तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही,असेही सामनात म्हटले आहे.

Protected Content