Home Cities बुलढाणा डाक विभागात ५ ऑगस्टपासून नवीन डिजिटल प्रणाली लागू

डाक विभागात ५ ऑगस्टपासून नवीन डिजिटल प्रणाली लागू


बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय डाक विभागाने आपल्या सेवा प्रणालीमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी ‘आय.टी. 2.0’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत ‘एपीटी (APT) अप्लिकेशन’ ही नवीन डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्याची घोषणा केली आहे. या नव्या प्रणालीमुळे टपाल व्यवहार अधिक जलद, अचूक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, पोस्ट ऑफिसमधील सेवा आणखी सक्षम होतील.

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शाखा टपाल कार्यालये आणि उपडाकघरांमध्ये ही प्रणाली मंगळवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२५ पासून लागू करण्यात येत आहे. या डिजिटल संक्रमणासाठी आवश्यक असलेल्या डेटाच्या स्थलांतराची प्रक्रिया सोमवार, दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडणार आहे. यामुळे, ४ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये कोणताही व्यवहार करता येणार नाही.

ज्या नागरिकांची किंवा ग्राहकांची महत्त्वाची कामे आहेत, त्यांनी ४ ऑगस्टपूर्वीच ती पूर्ण करावीत, जेणेकरून व्यवहारात कोणताही अडथळा येणार नाही, अशी माहिती अधीक्षक डाकघर, बुलढाणा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर ग्राहकांना अधिक कार्यक्षम आणि आधुनिक सेवांचा अनुभव घेता येईल, असा विश्वास डाक विभागाने व्यक्त केला आहे. ‘आय.टी. 2.0’ हा उपक्रम डाक विभागाला डिजिटल युगात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास मदत करेल.


Protected Content

Play sound